शारदीय नवरात्रोत्सवातील चौथ्या दिवशी श्री अंबाबाईची मातंगी रूपात पूजा

शारदीय नवरात्रोत्सवातील चौथ्या दिवशी श्री अंबाबाईची मातंगी रूपात पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पूजन मातंगी देवीच्या रूपात करण्यात आली. मातंगी देवी ही नवविद्या महाविद्यांपैकी एक असून, ती लघुश्यामा, उच्छिष्टमातंगी, राजमातंगी, संमोहिनी, चंडमातंगी, वश्यमातंगी, कर्णमातंगी, तैलमातंगी अशा विविध नावांनी ओळखली जाते.

धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव हे ‘मतंग’ रूपात त्रिपुरीची उपासना करत असताना त्यांच्या नेत्रतेजातून या देवीची उत्पत्ती झाली, तर दुसऱ्या मते, ती मतंग ऋषींची कन्या म्हणून अवतरली. त्यामुळे तिला ‘मातंगी’ असे नाव प्राप्त झाले. तिचे भैरव ‘मतंग’ आहेत आणि ती श्रीकुलातील उत्तराम्नायपीठस्थ देवता मानली जाते. मातंगी देवीच्या उपासनेमुळे वाणीवर प्रभुत्व, काव्यप्रतिभा, वेद-वेदांत ज्ञान, ज्योतिषशास्त्र व संगीतविद्येचा लाभ होतो, तसेच भक्तांच्या शत्रूंचा नाशही घडतो. ती सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवी मानली जाते.