15 फेब्रुवारीला चौकशी रिपोर्ट येणार होता काय झालं? आ. रोहित पवार
(दिल्ली वृत्त संस्था) नवी दिल्ली - VSR कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे. त्यात सत्तेतल्या लोकांचा समावेश आहे. शिवाय ज्या उद्योगपतींचे राजकीय कनेक्शन आहे त्यांचाही VSR कंपनीत सहभाग आहे. बारामती विमान अपघाताबाबत २ प्रकारचं षडयंत्र असू शकते. त्यात एक राजकीय आणि दुसरे व्यावसायिक षडयंत्र असू शकते. यामागचे खरे कारण शोधले पाहिजे. जी VSR कंपनी विमान अपघाताला जबाबदार आहे त्याला जर कुणी सपोर्ट करत असेल आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर तेदेखील एक षडयंत्र असू शकते असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, VSR कंपनीच्या पाठीशी इतके शक्तिशाली लोक आहेत, त्यात DGCA चे अधिकारीही पाठीशी आहेत. त्यामुळे जर अजित पवारांना न्याय द्यायचा असेल तर देशातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे न्याय देऊ शकतात. कारण इतर जे कुणी आहेत तेही पॉवरफुल आहेत परंतु सध्या देशात सर्वात जास्त २ व्यक्ती पॉवरफुल आहेत. त्यामुळे विमान अपघातावर मोदी-शाह यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. याबाबत पंतप्रधान मोदींना ईमेलद्वारे पत्र पाठवणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच केंद्रीय नागरी हवाई मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा अशी आमची मोठी मागणी आहे. मोदी-शाहांकडे आमची ही मागणी असेल. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हा विषय हाती घ्यावा आणि टीडीपी पक्षाचे नेते जे नागरी हवाई वाहतूक मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. DGCA मधील मोठमोठे अधिकारी VSR कंपनीला मदत करत आहेत. जर अपघाताची चौकशी हे अधिकारी करत असतील तर चोरच पोलिसांची चौकशी करत असल्याचं बोलावे लागेल. जी चौकशी समिती नेमली त्या अधिकाऱ्यांना लिअरजेटबाबत काहीच माहिती नाही. १५ फेब्रुवारीला चौकशीचा रिपोर्ट येणार होता त्याचे काय झाले? असा सवाल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला.




