सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देऊन ६ दिवस उलटले; नोटिशीला उत्तर न मिळाल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देऊन ६ दिवस उलटले; नोटिशीला उत्तर न मिळाल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि राजकीय वाद आता थेट चव्हाट्यावर आले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला मिळालेल्या आव्हानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पक्षाचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीला ६ दिवस उलटूनही पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून पक्षात दोन तट पडल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरच थेट आक्षेप घेतला होता. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा करत, ही निवड रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी या नोटिशीद्वारे केली आहे.

सच्चिदानंद सिंह यांच्या मते, २६ फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक कायदेशीरदृष्ट्या अवैध आहे. या नोटिशीमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली असून, सुनेत्रा पवार यांच्या निवडीच्या वेळी काही कायदेशीर त्रुटी राहिल्या होत्या का? याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, थेट अध्यक्षांना आव्हान देणाऱ्या सच्चिदानंद सिंह यांच्यावर पक्षाने अद्याप कोणतीही शिस्तभंग किंवा अंतर्गत कारवाई केलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणामागे पक्षातीलच काही बड्या नेत्यांचा हात आहे का, यादृष्टीने आता पक्षाचे वरिष्ठ नेते पडताळणी करत असल्याची माहिती समोर येत आहे. ६ दिवसानंतरही या नोटिशीला उत्तर न दिले गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत असून आगामी काळात हा वाद कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.