CWG 2026: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक डंका ! ९६ वर्षांत पहिल्यांदाच घडले; बॉक्सर्सनी जिंकली तब्बल १० पदके
ग्लास्गो : ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (CWG 2026) मध्ये भारतीय बॉक्सर्सनी सुवर्णपदकांचा वर्षाव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत नेमबाजी, बॅडमिंटन आणि कुस्ती या पारंपरिक खेळांचा समावेश नसल्यामुळे भारताच्या पदकांची संख्या घटेल, असा अंदाज क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, भारतीय खेळाडूंनी हा सर्व अंदाज चुकीचा ठरवला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ९६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय बॉक्सर्सनी ७ सुवर्ण आणि ३ रौप्य अशा तब्बल १० पदकांची ऐतिहासिक कमाई केली आहे.

महिला बॉक्सर्सचे रिंगमध्ये पूर्ण वर्चस्व
या ऐतिहासिक यशात भारतीय महिला बॉक्सर्सचा वाटा मोठा आहे. महिला बॉक्सर्सनी रिंगमध्ये पूर्ण वर्चस्व गाजवत ५ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावले. प्रीती पवार, जॅस्मिन, साक्षी, प्रिया घंघास आणि अरुंधती चौधरी यांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवून सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. तर ऑलिम्पिक पदकविजेत्या लव्हलिना बोरगोहेनने प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.
पुरुष बॉक्सर्सचाही सुवर्ण पंच
पुरुष विभागातही भारतीय खेळाडूंनी २ सुवर्ण आणि २ रौप्यपदके जिंकून शानदार कामगिरी केली. सचिन आणि अंकुश यांनी जोरदार ठोसे लगावत सुवर्णपदक जिंकले, तर जादुमणी आणि नरेंद्र यांनी रौप्यपदक मिळवले. हरियाणाच्या नरेंद्रने ९०+ किलो वजनी गटात भारतासाठी बॉक्सिंगमधील १० वे पदक निश्चित केले.
पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर
बॉक्सिंग, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि अॅथलेटिक्समधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने स्पर्धेचा शेवटचा दिवस शिल्लक असतानाच १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ८ कांस्य अशी एकूण ३८ पदके पटकावली आहेत. यासह भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मजबूत केले आहे.
१९३४ मध्ये राष्ट्रकुलमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक जिंकण्यासाठी १९९८ पर्यंत वाट पाहावी लागली होती. २००२ मध्ये मोहम्मद अली कमरने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०२६ च्या या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवून नवा इतिहास रचला आहे.




