राज्यात महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान;१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि शासकीय सेवा पात्र नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत तालुकास्तरावर ‘सेवा सेतू’ शिबिरे घेऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ आणि आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सेवा सेतू शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जिवंत सातबारा मोहीम, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नवीन नळजोडणी, मालमत्ता कर आकारणी, प्रलंबित घरगुती वीज जोडणी, तसेच ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासारख्या सेवा दिल्या जाणार आहेत. याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधार कार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राचाही समावेश आहे.

अभियानात प्रत्येक गाव व वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत स्वच्छता, रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, महिला आरोग्य, जलसंधारण, कचरा वर्गीकरण, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, मतदार जागृती आणि सरकारी योजनांची माहिती अशा उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
‘विकसित भारत’ संकल्पनेवर शाळांमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’, योजनांच्या यशोगाथांचे संकलन आणि ‘सेवा ज्योत यात्रा’ असेही उपक्रम होणार आहेत.
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती, तर राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. अभियानाची सांगता १७ ऑक्टोबर रोजी ‘जनसेवक महाकुंभ’ने होणार आहे.
यामध्ये जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने तालुकास्तरावर खालील प्रमाणे उपक्रम राबवण्यात येणार आहेत-
1. सर्व ग्रामपंचायत शाळा, अंगणवाडी पीएचसी उपकेंद्र पशुवैद्य दवाखाने यामध्ये स्वच्छता हीच सेवा राबवणार आहे .
2. शाळा अंगणवाडी पीएचसी उपकेंद्र पशुवैद्य दवाखाने सर्व शासकीय कार्यालयात रांगोळी काढण्यात येणार आहे
3. दसरापूर्वी स्वच्छता अभियान
4.पर्यावरण पूरक गणेशोत्सव अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे
5.लिंग गुणोत्तर जनजागृती
6.नशा मुक्त भारत अभियान
7.केंद्र व राज्य शासनाचे लाभार्थीच्या घरी आशीर्वाद दिवा लावण्यात येणार आहे ,
असे आवाहन अध्यक्ष, उपाध्यक्ष , सर्व सभासपती (विषय समिती) , सर्व जिल्हा परिषद सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.




