मुंबईपेक्षा आसाम-बंगाल महत्त्वाचे! अमित शाहांच्या दौऱ्यावर राऊतांची घणाघाती टीका

मुंबईपेक्षा आसाम-बंगाल महत्त्वाचे! अमित शाहांच्या दौऱ्यावर राऊतांची घणाघाती टीका

मुंबई  प्रतिनिधी - खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन, मनोज जरांगे पाटील आणि विद्यानंद बापट यांच्या आंदोलनाचा मुद्दाही उपस्थित केला.

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईपेक्षा त्यांनी आसाम, मणिपूर आणि बंगालमधील परिस्थितीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला.गणेशोत्सवाच्या काळात अमित शाह मुंबईत आल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि रस्ते बंद होण्याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतो, अशी टीकाही राऊतांनी केली.

मुंबईत मोठे उद्योगपती, बिल्डर आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित लोक असल्यामुळे अमित शाह वारंवार मुंबईत येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी दिल्लीबरोबरच मणिपूर, आसाम आणि बंगालसारख्या राज्यांतील परिस्थितीकडेही लक्ष द्यावे, असे राऊत म्हणाले.

जरांगे पाटलांच्या भाषेवरून सरकारला टोला

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही संजय राऊतांनी सरकारला सवाल केला. जरांगे पाटील यांना आंदोलनाचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत त्यांनी सरकार त्यांच्याशी चर्चा का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

जरांगे पाटील यांच्या भाषेमुळे त्यांच्या मागण्या मान्य करता येत नसल्याचे सरकारमधील काही मंत्री सांगतात. मात्र, पुण्यातील विद्यानंद बापट हे सभ्य आणि सुसंस्कृत भाषेत आंदोलन करत असतानाही त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिलेले नाही, असे राऊत म्हणाले.

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याचा आणि त्यांना धमक्या मिळत असल्याचा आरोप करत राऊतांनी सरकारवर टीका केली. सभ्य भाषेत आंदोलन करणाऱ्यांचेही म्हणणे सरकार ऐकत नसेल, तर मग सरकारला नेमकी कोणती भाषा समजते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारला जर शिव्यांचीच भाषा कळत असेल, तर तीच भाषा वापरावी लागेल,"असा टोला संजय राऊत यांनी लगावला. सरकारमधील काही लोक भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीचे असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.