संजय राऊतांचा मोठा दावा; ‘17 सप्टेंबरनंतर काय होतं ते बघा, मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस!’
मुंबई : दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात बुधवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती आणि केंद्र सरकारविरोधातील भूमिकेबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारबाबत मोठं विधान केल्याची माहिती समोर आली आहे. नरेंद्र मोदी पुढील 6 ते 8 महिन्यांत पंतप्रधानपदावर राहणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली. “मग मी गेले काही दिवस काय सांगतो आहे? या विषयावर राहुल गांधी आणि माझं एकमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी हेच सांगत आहे की, सध्या जे महाशय पंतप्रधान आहेत, ते त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत. त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत हे पद सोडावं लागेल,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘17 सप्टेंबरनंतर चित्र स्पष्ट होईल’
संजय राऊत पुढे म्हणाले की, “17 सप्टेंबरनंतर या गोष्टीचा उलगडा होईल. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. प्रधानमंत्री म्हणून हा त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल. तो त्यांनी आनंदात साजरा करावा. त्यांच्या भक्तांनी नाचावं, उड्या माराव्यात, गाणी गावीत, पार्ट्या कराव्यात आणि त्यानंतर पुढच्या प्रसंगाला सामोरं जावं.”
‘मोदी गेले तर अमित शाहही गेले’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह पंतप्रधान होणार का, यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. “अमित शाह कधीच प्रधानमंत्री होणार नाहीत. मोदी गये तो अमित शाह भी गये. एकावर एक फ्री आहेत ना ते,” अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
‘लाल किल्ल्यावरील भाषणही शेवटचं होतं’
यंदाचा 15 ऑगस्टचा लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणाचा कार्यक्रमही त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील शेवटचा असल्याचा दावा संजय राऊत यांनी पुन्हा केला. “जसं आम्ही म्हणालो की लाल किल्ल्यावरचं त्यांचं प्रधानमंत्री म्हणून शेवटचं भाषण आहे, तसंच प्रधानमंत्री म्हणून त्यांचा हा वाढदिवसही कदाचित शेवटचा असेल. माझ्याकडे असलेलं आकलन, राहुल गांधींचं म्हणणं आणि आमच्यासमोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे मी हे सांगत आहे,” असे राऊत म्हणाले.




