राजस्थानमध्ये बदलीचा मेसेज व्हायरल; तुकाराम मुंढेंनी स्वतः दिलं उत्तर

राजस्थानमध्ये बदलीचा मेसेज व्हायरल; तुकाराम मुंढेंनी स्वतः दिलं उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक खाद्यपदार्थ, उत्पादने आणि हॉटेल्सवर कारवाईचा धडाका लावला आहे. जवळपास दररोज एफडीएच्या पथकांकडून राज्यातील विविध भागांमध्ये संबंधित आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. भेसळयुक्त माल पकडण्यासोबतच हॉटेल, डेअरी आणि दुकानांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित आस्थापनांचे परवानेही निलंबित केले जात आहेत.

याचदरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातून राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात आला आहे. तसेच ही तुकाराम मुंढे यांची 26वी बदली असल्याचाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्वतः तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

"माझा राजस्थानशी काय संबंध? माझी बदली राजस्थानमध्ये कशी होईल? मी महाराष्ट्र कॅडरचा अधिकारी असल्याने माझी बदली महाराष्ट्रातच होऊ शकते," असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत होता. लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या या विभागात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला होता.त्यानुसार, 25 मे रोजी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता.