शेतकऱ्यांच्या हितासाठी 'गोकुळ'मध्ये स्वतंत्र लढवणार ; आमदार सतेज पाटलांचं मोठं विधान

शेतकऱ्यांच्या हितासाठी 'गोकुळ'मध्ये स्वतंत्र लढवणार ; आमदार सतेज पाटलांचं मोठं विधान


महायुती सरकारचे धोरण फक्त जाहिराती आणि फित कापण्यापुरतेच सीमित; डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे मनपाला १५५० एलईडी बल्ब हस्तांतरित

कोल्हापूर/प्रतिनिधी: "महायुती सरकारचे एकूण धोरण पाहता केवळ फिती कापणे, जाहिराती देणे आणि फटाके वाजवणे यापलीकडे काहीही राहिलेले नाही. हे सरकार केवळ 'भपका' करण्यात मग्न असून शाश्वत कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे," असा थेट आरोप काँग्रेसचे नेते, विधान परिषदेतील गटनेते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीवर ठाम भूमिका मांडली. "५.५ लाख शेतकऱ्यांचे हित आणि स्वाभिमानासाठी गोकुळमध्ये आमचे स्वतंत्र पॅनेल लढणार असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि गोकुळच्या हितासाठी लढणे हे आमचे कर्तव्य आहे," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे मनपाला १५५० एलईडी बल्ब
तत्पूर्वी, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला १५५० एलईडी बल्ब प्रदान करण्यात आले. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हे बल्ब महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचे केंद्रीयकरण
स्ट्रीट लाईटच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधताना पाटील म्हणाले, "महापालिकेला आपल्या शहरातील स्ट्रीट लाईट किंवा ५०० रुपयांचा बल्ब खरेदी करण्याचाही अधिकार उरलेला नाही. दिव्यांची खरेदीसुद्धा आता राज्य शासन करणार आहे. अंधार पडल्यावर दिव्यांसाठी मुंबईकडे पाहायचे का? सर्व गोष्टींचे केंद्रीयकरण सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत."

 सत्ताधाऱ्यांकडून उद्घाटनांचा केवळ फार्स
मुख्यमंत्री व महायुतीच्या मंत्र्यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनांवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, "उद्घाटनांचा केवळ फार्स सुरू आहे. उद्घाटन झालेले प्रकल्प प्रत्यक्षात चालू झाले आहेत का? केशवराव भोसले नाट्यगृहातील साऊंड सिस्टीम काल बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे किमान प्रकल्पांचा दर्जा तरी सांभाळला जावा, हीच प्रशासनाकडून अपेक्षा आहे."

 

गोकुळ आणि शक्तिपीठ महामार्गावर ठाम भूमिका
गोकुळ निवडणूक: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांचे हित आणि स्वाभिमानासाठी गोकुळमध्ये आमचे स्वतंत्र पॅनेल लढणार आहे. ५.५ लाख शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि गोकुळच्या हितासाठी लढणे हे आमचे कर्तव्य आहे."


शक्तिपीठ महामार्गाला विरोध
या महामार्गाला राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. जिथे सुपीक आणि पिकाऊ जमिनी जात आहेत, तसेच आधीच नागपूर-रत्नागिरी महामार्ग उपलब्ध असताना या नव्या महामार्गाची मुळीच गरज नाही. सांगलीत होणाऱ्या मोर्चात आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत.

साखरेची एमएसपी:
साखरेची 'एमएसपी' वाढवण्याबाबत केंद्र सरकारने दिलेले १५ दिवसांचे आश्वासन अद्याप पाळलेले नाही, त्यामुळे साखरेच्या बाजारावर याचा विपरीत परिणाम दिसत आहे.

 राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावर वक्तव्य
पुण्यातील राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाबाबत बोलताना सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. ते म्हणाले, "हा कोणताही पक्षीय कार्यक्रम नसून क्यूआर कोडद्वारे खुली नोंदणी (Registration) होती. कोल्हापुरातून ५०० हून अधिक मुली, तसेच नंदुरबार, गडचिरोली आणि गुजरातवरूनही युवक-युवती सहभागी झाले आहेत. राहुल गांधी हे देशातील तरुणांसाठी आशेचा किरण ठरत असून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळेच विरोधक अस्वस्थ होऊन टीका करत आहेत."