धनंजय मुंडे ओबीसींचे ‘ऑलराऊंडर’; लक्ष्मण हाकेंकडून कौतुकाचा वर्षाव, भुजबळांनाही दिला थेट सल्ला

धनंजय मुंडे ओबीसींचे ‘ऑलराऊंडर’; लक्ष्मण हाकेंकडून कौतुकाचा वर्षाव, भुजबळांनाही दिला थेट सल्ला

बीड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलीकडेच पार पडलेल्या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःला पक्षाचा ‘बारावा खेळाडू’ असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मुंडेंचे कौतुक करत त्यांना ओबीसी समाजाचा ‘ऑलराऊंडर’ नेता असल्याचे म्हटले.हाके म्हणाले, “धनंजय मुंडे हे बारावे खेळाडू नाहीत. ओबीसी समाजाच्या दृष्टीने ते संघातील ओपनिंग बॅट्समन आहेत. एवढेच नव्हे तर ते एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. राजकारणात चढ-उतार येत असतात. कोणत्याही खेळाडूचा फॉर्म कधी कमी-जास्त होतो, मात्र योग्य वेळ आली की तोच खेळाडू संघाला विजय मिळवून देतो.”

मुंडेंना उद्देशून ते पुढे म्हणाले, “तुमची लाईन आणि लेन्थ कायम ठेवा. ओबीसी समाजाचा विश्वास तुम्ही जिंकलात तर संघात कोणाला स्थान द्यायचे आणि कोणाला बारावा खेळाडू बनवायचे, याची ताकद तुमच्यात आहे. त्यामुळे स्वतःला बारावा खेळाडू म्हणणे योग्य नाही.”यावेळी हाके यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबतही भूमिका स्पष्ट केली. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून भुजबळ यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांनी काम केले. त्यामुळे पक्षातील एखादे पद किंवा जबाबदारी मिळणे ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही,” असे ते म्हणाले.

तथापि, भुजबळ आणि मुंडे या दोघांनाही सल्ला देताना हाके म्हणाले, “आम्हाला पद द्या किंवा संधी द्या, अशी भूमिका ओबीसी समाजाला पसंत नाही. तुम्ही नेतृत्व करणारे नेते आहात. खासदारकी किंवा पदांसाठी अपेक्षा व्यक्त करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या.”ओबीसी समाजाच्या भावना व्यक्त करताना हाके म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण ओबीसी समाजाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. “ओबीसी समाज आज जागरूक आहे. त्याला सक्षम नेतृत्व हवे आहे. त्यामुळे पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडून समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

शेवटी त्यांनी भुजबळ, मुंडे आणि इतर ओबीसी नेत्यांना आवाहन करत, “तुम्ही सर्व अनुभवी आणि सक्षम नेते आहात. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहा. ओबीसी समाज भविष्यातील राजकीय दिशा ठरविण्याची ताकद ठेवतो,” असे म्हटले.