एक पाऊल भक्तीकडे... एक पाऊल स्वच्छतेकडे!"; पुईखडी येथे गोकुळतर्फे वारकरी सेवा आणि स्वच्छता अभियान संपन्न!

एक पाऊल भक्तीकडे... एक पाऊल स्वच्छतेकडे!"; पुईखडी येथे गोकुळतर्फे वारकरी सेवा आणि स्वच्छता अभियान संपन्न!

कोल्हापूर/प्रतिनिधी : आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ' यांच्यावतीने सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीत सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांना आणि भाविकांना पुईखडी येथील रिंगण सोहळा परिसरात मोफत सुगंधी दूध आणि सार्थ हरिपाठ पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

 

"यावेळी गोकुळच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सागर बलकवडे यांच्यासह संघातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते वारकऱ्यांना सुगंधी दूध व हरिपाठ पुस्तिका सुपूर्द करण्यात आल्या."

स्वच्छतेचा संदेश

"केवळ वारकरी सेवाच नाही, तर गोकुळने स्वच्छतेचा मोठा संदेशही दिला. रिंगण सोहळा परिसरात 'आपली दिंडी – स्वच्छ दिंडी', 'एक पाऊल भक्तीकडे... एक पाऊल स्वच्छतेकडे' आणि 'माऊलींची वारी, स्वच्छतेची जबाबदारी' असे जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते.

विशेष म्हणजे, दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर गोकुळच्या १५ स्वयंसेवकांनी परिसरात जमा झालेल्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणि इतर कचरा गोळा करून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. फलकांवरील संदेश केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून गोकुळने पर्यावरण संवर्धनाचा सुंदर पायंडा पाडला आहे."

"या कार्यक्रमाला डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह संघाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व महिला मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिभाव, वारकरी सेवा आणि स्वच्छतेचा हा अनोखा मेळ उपस्थित वारकऱ्यांच्या भलताच पसंतीस उतरला.