गोकुळच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग ; आ. सतेज पाटलांच्या शिलेदारांनी ZP उपाध्यक्ष तानाजी पाटलांची घेतली भेट

गोकुळच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग ; आ. सतेज पाटलांच्या शिलेदारांनी ZP उपाध्यक्ष तानाजी पाटलांची घेतली भेट

वाढदिवसाची सदिच्छा भेट की गोकुळ निवडणुकीची जोडणी? महाडिक समर्थक तानाजी पाटलांच्या भेटीने चर्चेला उधाण

कोल्हापूर : (अभिजित शिंदे): कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. महायुतीमध्ये सुप्त सत्तासंघर्ष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. शिरोळ, करवीर, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यांच्या दौऱ्यादरम्यान ते भाजप नेते व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातच चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची सतेज पाटलांनी घेतलेली भेट आणि आता महाडिक समर्थक जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या निवासस्थानी सतेज पाटलांच्या संचालकांनी घेतलेली भेट, यामुळे जिल्ह्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दोन पाटील एकत्र येण्याच्या चर्चा
गेल्या काही दिवसांपासून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर थेट आरोप करणारे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची आज आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जिल्ह्यात "दोन पाटील एकत्र येणार" अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाडिक समर्थकांच्या भेटीचा फोटो व्हायरल
या राजकीय घडामोडी ताज्या असतानाच आज आणखी एका भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली. आमदार सतेज पाटील यांचे गोकुळमधील खंदे शिलेदार – संचालक बाबासाहेब पाटील, शशिकांत पाटील (चुयेकर), बयाजी शेळके आणि प्रकाश पाटील यांनी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

केवळ वाढदिवसाची भेट की राजकीय समीकरण?
तानाजी पाटील हे कट्टर महाडिक समर्थक मानले जातात. महाडिक गटाशी असलेल्या प्रदीर्घ निष्ठेमुळेच त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि राजाराम कारखान्याचे संचालकपद मिळाले आहे. त्यामुळे ते सहजासहजी विरोधी गटात जाण्याची शक्यता कमी मानली जाते.

सतेज पाटलांच्या संचालकांनी मात्र या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. बुधवारी तानाजी पाटील यांचा वाढदिवस होता. केवळ त्या निमित्ताने सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. या भेटीला कोणताही राजकीय रंग नाही, असे संचालकांकडून सांगण्यात आले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीचे अर्थ काय?
संचालकांनी ही भेट केवळ औपचारिक आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती मर्यादित असल्याचे स्पष्ट केले असले, तरी 'गोकुळ'च्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे निवडणुकीची काही गुप्त जोडणी आहे, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या भेटीमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे हे मात्र नक्की.