जयंत पाटील माझ्याकडेही आले होते...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि खळबळजनक खुलासा केला आहे. "जयंत पाटील हे केवळ फडणवीसांनाच नाही, तर माझ्याकडेही आले होते," अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे.

शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जयंत पाटील यांच्या भेटीवर भाष्य केले.
राजकीय अर्थ काढू नका; शिंदेंनी स्पष्ट केले कारण
जयंत पाटील यांच्या भेटीबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आमच्या महायुतीत आणि एनडीएत आहेत. जयंत पाटील माझ्याकडेही आले होते, ते सांगलीच्या नगरपरिषदेच्या एका विषयावर आले होते. त्यांनी स्वतः देखील याचा खुलासा केला आहे की ते सांगलीच्या काही स्थानिक कामांसाठी गेले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटणं काही गैर आहे का? यात काय चुकीचं आहे? तुम्ही प्रत्येक गोष्टीचा राजकीय अर्थ कशाला काढता?" असे म्हणत त्यांनी या भेटीमागील राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
शरद पवारांच्या भेटीचाही सांगितला किस्सा
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या एका भेटीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "पवारसाहेब पण एकदा आले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील लोकांची एक बैठक होती, त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री, मी आणि शरद पवार साहेब उपस्थित होते. ती बैठक संपल्यानंतर जाताना त्यांना त्यांच्या काही आमदारांविषयी चर्चा करायची होती, त्यामुळे ते माझ्या दालनात आले होते. मला कळताच मी तिथे गेलो. ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचे स्वागत करणे ही आमची संस्कृती आहे."
"काही लोकांना विकृती झालीय..." मविआवर टीकास्त्र
याच मुद्द्यावरून महाविकासआघाडीवर निशाणा साधताना मुख्यमंत्री शिंदे कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. ते म्हणाले, "आम्ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपतो, पण काही लोकांना आता विकृती झाली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये विकृत भाष्य करण्याची त्यांना सवय लागली आहे. ज्या शरद पवारांचं तुम्ही खाता, ज्या शरद पवारांचं तुम्ही गुणगान गाता, आज त्यांच्याविरोधातच तुम्ही भूमिका घेताय? ही कुठली महाविकासआघाडी? ते सध्या पूर्णपणे गोंधळलेले आणि बिथरलेले आहेत. आपण काय बोलतोय हेच त्यांना समजत नाहीये, कारण त्यांचा पराभव दररोज होत आहे."




