‘रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही’; ‘सरपट नाईक’ म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
मुंबई (प्रतिनिधी) : उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही पत्रकारांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी भाषेत अपशब्द वापरल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनीही जरांगे पाटलांना इशारा दिला आहे. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता. यावर आता जरांगे पाटलांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना लक्ष्य करत पलटवार केला आहे. “रस्त्यावर उतरायला सांगावं, बस घेऊन... वळवळ केली तर रट्ट्याचे दिवस येतील. तुम्ही रट्ट्याची भाषा केली, त्याला रट्ट्यानेच उत्तर मिळेल,” असं म्हणत जरांगे पाटलांनी प्रताप सरनाईक यांना इशारा दिला.
“प्रताप सरनाईक, तुमचं फडणवीसांबद्दल काय मत आहे, हे सर्वांना माहिती आहे. मला वाटतं मी महाविकास आघाडीला बोलावं. मी तुमचा नोकर आहे का? मी महाविकास आघाडी सत्तेत असतानाही त्यांच्या विरोधात बोलत होतो. तुम्ही जिथे सत्ता असेल, तिकडेच जाणार आहात,” अशी टीका जरांगे पाटलांनी केली.
“तुम्ही एकनाथ शिंदेंना सोडून भाजपमध्ये जाणार, हे या सर्वांनी ठरवलं आहे. थोड्या दिवसांत हे फडणवीसांकडे दिसतील. हेच उद्या म्हणतील, फडणवीस साहेबांना बोलू नका, एकनाथ शिंदेंबद्दल बोला,” असं म्हणत जरांगे पाटलांनी प्रताप सरनाईक यांच्यावर पलटवार केला.
“सरपट नाईक आहे तो. आम्हीही उपोषण करून कदरलो. आता संयम सोडा, आम्ही पाहतोच. ते दिघे साहेब आणि बाळासाहेबांच्या काळातील सांगत आहेत. पण अंडरवर्ल्डचे दिवस गेले आहेत,” असं जरांगे पाटील म्हणाले. “यांनी बैठकीत ठरवलं आहे, त्यांना चेंगरून टाकू. सरनाईकने संयम सोडावा. मुंबईत गुंड जमा करणं त्याला सोपं आहे. पण गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि आर. आर. आबांनी अंडरवर्ल्ड संपवलं. राहिलेलं आम्ही संपवू,” अशा शब्दांत जरांगे पाटलांनी प्रताप सरनाईक यांच्यावर हल्लाबोल केला.
“हसत गोळ्या अंगावर घेतल्या नाहीत, तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही,” अशा शब्दांतही जरांगे पाटलांनी प्रताप सरनाईक यांना प्रत्युत्तर दिलं.
“अंडरवर्ल्डमध्ये होतो म्हणून गुंडगिरीच्या जीवावर भीती घालू नका. एक कोटी, दोन कोटींचे दिवस गेले. आता पाच हजारांत पोरं ठ्याव-ठ्याव करतात,” असं म्हणत जरांगे पाटलांनी प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार पलटवार केला.




