उमेदच्या रानभाजी व गणपती महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एका दिवसात 1लाख 15 हजाराची विक्री
कोल्हापूर (प्रतिनिधी )उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व गणपती महोत्सवाचे आयोजन बुधवार ९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या प्रांगणात करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, आरोग्य व बांधकाम सभापती सारिका यशवंत नांदेकर, अर्थ व शिक्षण सभापती शिल्पा प्रवीण यादव, जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, तसेच सभापती पंचायत समिती कागल सुवर्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विभागीय आयुक्त, पुणे शितल उगले यांनी महोत्सवास भेट देऊन महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली.
या एकदिवसीय महोत्सवामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या रानभाज्या, गणपती सजावटीच्या आकर्षक वस्तू तसेच विविध उपयुक्त साहित्याचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. ग्रामीण महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्थानिक व पारंपरिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि महिलांच्या उत्पन्नवाढीस चालना देणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.
जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत व बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले व स्टॉल धारक महिला बचत गटांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे स्वागत व आभार संतोष जोशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी मानले.
महोत्सवामध्ये एकूण 72 स्वयंसहायता समूहांमधील 150 महिलांनी सहभाग नोंदविला.
टाकळा, अळू, मायाळू, तांदुळजा, घोळ, करडई, शेवगा पाने, आघाडा, चाकवत, माठ, कुर्डू, अंबाडी, हादगा, केना, कुरडूची भाजी, सुरणाची पाने/कंद, काटेमाठ, लाल माठ, तरवड, शेवाळ, तेरडा, चिचुर्डी, पाथरी, तांदुळजाची भाजी, खापरफुटी, कोरफड, रानभेंडी, बांबू कोंब, भोपळी, तोंदली, रानकारली या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. महिलांनी मांडलेल्या उत्पादनांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एका दिवसात एकूण ₹1,15,720 इतकी विक्री झाली. त्यामुळे महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या उद्योजकतेला आणि आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जास्मिन मुख्यकार्यकारी अधिकारी व संतोष जोशी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.




