शरीर साथ देत नाही, मोदीजींनी आता सत्तेपासून दूर व्हावे; नेहरूंप्रमाणेच…; संजय राऊतांची मोठी मागणी

शरीर साथ देत नाही, मोदीजींनी आता सत्तेपासून दूर व्हावे; नेहरूंप्रमाणेच…;  संजय राऊतांची मोठी मागणी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती आणि वय आता त्यांना साथ देत नाही, असे म्हणत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मोदींवर गंभीर शब्दांत टीका केली आहे. पंडित नेहरू जसे अखेरच्या काळात थकले होते, तसेच आता पंतप्रधान मोदीही थकले आहेत. त्यामुळे राष्ट्रहितासाठी त्यांनी सत्तेपासून दूर होत मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी मोठी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

 राहुल गांधींच्या दबावामुळे मंत्रिमंडळात बदल?
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल विस्ताराच्या शक्यतेवर बोलताना राऊत म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर मोठा दबाव निर्माण केला आहे. राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारचे अपयश समोर येत असल्यानेच त्यांना मंत्रिमंडळात बदल करावे लागत आहेत. मात्र, इतर मंत्री अकार्यक्षम असताना केवळ वरवरचे बदल करण्यात काहीच अर्थ नाही, असा टोला त्यांनी लगावला.

शिवराज सिंग आणि नितीन गडकरी सोडले तर सर्वकाही रामभरोसे
भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि अमित शहा यांची प्रतिमा पूर्णपणे खालावली आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील तब्बल ९९ टक्के मंत्री अकार्यक्षम आहेत. पक्षात शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यक्षम नेते सोडले, तर बाकी सर्व काही 'रामभरोसे' चालले आहे, अशी टीका त्यांनी केली.


शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे मोदींनी बाजूला व्हावे
पंतप्रधानांच्या प्रकृतीबाबत भाष्य करताना राऊत पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांचे नेतृत्व आता मोदींच्या कितीतरी पुढे निघून गेले आहे. मोदी सत्तेत नसतील तेव्हा ते नेतेही नसतील, पण राहुल गांधी हे देशाचे प्रमुख नेते बनले आहेत.

मोदींच्या आरोग्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, "नेहरू जसे थकले होते, तसेच आता मोदी थकले आहेत. त्यांना पुरेशी झोप लागत नाही, ही चिंतेची आणि मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची खिल्ली उडवली जात असून त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीला चिटकून बसणे राष्ट्रहित नाही. मोदी-शहांनी सत्तेपासून दूर होऊन मार्गदर्शकाचे काम करावे, यालाच खरी देशसेवा म्हणतात."