‘कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय?’ राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल

‘कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय?’ राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात मुंबई, पुणे आणि साताऱ्यासारख्या शहरांमध्ये नृत्यांगनांना नाचवण्याच्या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. धार्मिक सणांमध्ये नृत्यांगनांना नाचवणे आणि अश्लील नृत्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. या सगळ्या वादावर नृत्यांगना राधा पाटील हिने जोरकसपणे आपली बाजू मांडली आहे.

 लोकांना वाटतं कंबर हलवणं म्हणजे अश्लील आहे. लावणीमध्ये काय कंबर हलवली जात नाही का? कोणताही डान्स करताना महिला कंबर हलवतातच. महिलांच्या डान्समध्ये एक तरी स्टेप कंबर हलवण्याची असतेच. पण लोक आता त्यावरूनही टीका करत आहेत, असे राधा पाटील हिने मुलाखतीत सांगितले.

 कुठलाही मुद्दा घेऊन आम्हाला जज करणार, आम्ही पण किती सहन करायचे? आम्हालाही प्रॉब्लेम्स असतात, फक्त आम्ही ते दाखवत नाही, आम्ही लोकांसमोर बोलत नाही, एवढंच आहे. लावणी आणि मी दहीहंडीत जो डान्स केला त्यामध्ये फरक आहे, मला मान्य आहे. पण असं नाही की आम्ही पूर्ण पाश्चात्य डान्स करत आहोत. आम्ही लावणी, वेस्टर्न असे दोन्ही प्रकारचे डान्स करतो.

 अनेकांना वाटतंय अशा गाण्यांमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. पण माझ्या कार्यक्रमात एकही हिंदी गाणं नाही. माझ्या कार्यक्रमातील सगळी गाणी मराठीच असतात. बाकीच्यांनी हिंदी गाण्यांवर डान्स केला की तुम्हाला दिसत नाही. पण माझ्याबाबत फक्त एकच मुद्दा धरून तुम्ही तो ताणताय, अशा शब्दांत राधा पाटील हिने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. आधीच जर घाणेरडे हातवारे करणाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर आता मग का बोलताय? अशीही तुम्ही टीका करता. मग मी आता त्या गोष्टी करते, मग टीका करा, असेही राधा पाटील हिने म्हटले.

 आम्ही नृत्य सादर करताना साडी नेसतो. साडी नेसल्यानंतर ब्लाऊज आणि कंबर दिसणं ही बाब कॉमन आणि साहजिक आहे. मग कंबर दिसण्यात अश्लीलता काय? मी वैयक्तिक सांगते, कधीही अश्लील हातवारे करत नृत्य सादर केलेले नाही. मी नृत्य सादर करताना अश्लील हावभाव करत असल्याचा व्हिडीओ दाखवा, असे आव्हान राधा पाटील हिने टीकाकारांना दिले.

 राधा पाटील हिने अप्रत्यक्षपणे गौतमी पाटील हिच्यावरही टीका केली. पाटील नाव आहे, म्हणून मला टार्गेट करताय का? एका पाटीलने घाण केली आहे, म्हणजे दुसरीही पाटील घाण करेल? असं म्हणत मला तुम्ही टार्गेट करताय का? असा सवाल तिने केला. यापूर्वी जेव्हा काहींनी अश्लील हातवारे केले, तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मग आता माझ्यावरच टीका का होत आहे? मला माहितीये मी अश्लील गोष्टी नाही करत. घरातील बायकाही साडी नेसतात. त्यामुळे पोट दिसणं साहजिक आहे. बाकीचं माझं काय वाईट आहे, ते मला दाखवून द्या, असे राधा पाटील हिने म्हटले.