सिया गोयल प्रकरणाला नवे वळण! भावावर 10 कोटींची कायदेशीर नोटीस

सिया गोयल प्रकरणाला नवे वळण! भावावर 10 कोटींची कायदेशीर नोटीस

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक नवे आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या वकिलावरून निर्माण झालेला वाद आता थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या कायदेशीर नोटिशीपर्यंत पोहोचला आहे.सोमवारी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाच्या वतीने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्याकडे सियाचे अधिकृत वकीलपत्र नसल्याने यावर आक्षेप घेण्यात आला.

यानंतर न्यायालयात सिया गोयलने स्पष्टपणे सांगितले की,"माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत."सियाच्या या वक्तव्यानंतर न्यायालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांना सुनावणीतून माघार घ्यावी लागली.या घडामोडीनंतर अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याच्याविरोधात 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. साहिलने आपल्याविरुद्ध खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्यामुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या नोटिशीत साहिल गोयलने 48 तासांच्या आत सार्वजनिक माफी मागावी, केलेले आरोप मागे घ्यावेत आणि भविष्यात अशा प्रकारचे आरोप पुन्हा करणार नाही, असे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवालला खाली ढकलून त्याची हत्या झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल तसेच तिच्या आई-वडिलांचीही चौकशी केली आहे. याशिवाय आरोपींचे सोशल मीडिया अकाउंट्स, व्हॉट्सअॅप चॅट्स आणि इंटरनेटवरील हालचालींचाही डिजिटल तपास सुरू आहे, जेणेकरून अधिक ठोस पुरावे मिळू शकतील.