कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण; जमिनीचा वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मुंबई (प्रतिनिधी) : शेतीच्या बांधावरून झालेलं भांडण असो किंवा जमिनीवरून निर्माण झालेला वाद असो, अनेकदा अशा वादांना गंभीर स्वरूप प्राप्त होतं. अनेकदा भावा-भावांमध्ये, भाऊबंदकीत किंवा शेतीच्या शेजाऱ्यांमध्येही अशा प्रकारचे वाद होतात. मात्र, आता चक्क राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतणे यांनाच शेतीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. अमेय अजित सावे (वय 35 वर्षे) आणि अजित मोरेश्वर सावे (वय 70 वर्षे), रा. खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावं आहेत.

शेती आणि रस्त्याच्या वादातून एका गटाने अतुल सावे यांच्या बंधूंना मारहाण केल्याची घटना घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. सध्या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांनाही बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदवले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, अतुल सावे हे राज्यातील कॅबिनेट मंत्री असून भाजपमधील वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भावाला झालेल्या मारहाणीच्या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जात असल्याची चर्चा आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय आणि मारहाण करणारे कोण होते, याबाबत पोलिसांच्या तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.




