एकनाथ शिंदेंचं परभणीत भाषण सुरु होताच दाखवले काळे झेंडे

एकनाथ शिंदेंचं परभणीत भाषण सुरु होताच दाखवले काळे झेंडे

परभणी: परभणी येथील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहताच मराठा आरक्षण आंदोलकांनी 'एक मराठा, लाख मराठा'च्या जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. मनोज जरांगे-पाटील यांनी या कार्यक्रमाला विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या भाषणादरम्यान हा गदारोळ पाहायला मिळाला.


अचानक झालेल्या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेंनी मध्यस्थी करत पोलिसांना सांगितले, "घोषणा देणारे सर्व आपलेच लोक आहेत, त्यांना साईडला सन्मानाने थांबू द्या आणि हवे असल्यास मंचावर बोलवा."

भाषणातील प्रमुख मुद्दे:

  • लाडक्या बहिणींचा भाऊ हीच खरी ओळख: "मी विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री झालो, पण महाराष्ट्रातील हजारो लाडक्या बहिणींचा भाऊ असणे हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे," असे वक्तव्य त्यांनी केले.

  • तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार: राज्य सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी, युवक आणि लाडक्या बहिणींचा आहे. केंद्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ६००० रुपये देण्याचा निर्णय आमच्या सरकारनेच घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • परभणीच्या विकासासाठी कटिबद्ध: माजी खासदार बंडू जाधव (संजय जाधव) यांनी खऱ्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगत शिंदे म्हणाले, "विरोधी पक्षात राहून विकास शक्य नाही हे ओळखून त्यांनी हा निर्णय घेतला. परभणीसाठी ११० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून डबल इंजिन सरकार विकासात कोणतीही कसर सोडणार नाही."