जि.प. कर्मचारी सोसायटीच्या हिरक महोत्सवी वर्षात सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन
सभासदांच्या पाल्यांना २४ तास अभ्यासाची सुविधा
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि., कोल्हापूरच्या हिरक महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त संस्थेच्या सभासदांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या अभ्यासिका व ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे तसेच उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग प्रमोद बाबर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

या सुसज्ज अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुमारे ३२०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली अन्य पुस्तके उपलब्ध करून देण्याचीही संस्थेची भूमिका आहे. यापूर्वी संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी केवळ पुस्तके उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, आता पुस्तके उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शांत व अभ्यासपूरक वातावरण मिळावे यासाठी सुसज्ज अभ्यासिकेची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
ही अभ्यासिका २४ तास सुरू ठेवण्याचा संस्थेचा मानस असून, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याचेही नियोजन आहे.
त्याचबरोबर सभासद, सेवानिवृत्त सभासद तसेच कर्मचारी यांच्या बौद्धिक व मानसिक समृद्धीसाठी स्वतंत्र सुसज्ज ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रंथालयात नामवंत लेखकांच्या कादंबऱ्या, आत्मचरित्रे तसेच विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सभासदांना ग्रंथालयात पुस्तके वाचण्याबरोबरच नोंद करून ती घरी नेऊन वाचनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सातत्याने पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. या उपक्रमाचा लाभ घेत आतापर्यंत ५० हून अधिक सभासदांच्या पाल्यांची वर्ग-१ व वर्ग-२ पदांसह विविध शासकीय विभागांमध्ये निवड झाली असून ते सध्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
सभासदांच्या पाल्यांना केवळ पुस्तके उपलब्ध करून न देता त्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र व योग्य जागा उपलब्ध करून देण्याची संकल्पना संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. सुसज्ज पुस्तके, अभ्यासासाठी आवश्यक वातावरण आणि मार्गदर्शनाची सुविधा असलेली ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
सभासदांच्या पाल्यांनी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन संजय श्रीपतराव शिंदे यांनी केले आहे.
यावेळी संचालक नंदिप मोरे, श्रीकांत चव्हाण, रविंद्र जरळी, सुनील पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, सरदार दिंडे, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव तसेच तज्ज्ञ संचालक प्रविणकुमार पाटील, स्वप्निल घस्ते यांच्यासह संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम. एम. पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, सात्ताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदुम, दगडू परीट, कपिल पाटील उपस्थित होते.




