लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सायबर हल्ल्याचा संशय; 1200 विमानांचे मार्ग बदलले, पुरस्कारासाठी गेलेले उपमुख्यमंत्री शिंदेंचे 6 अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सायबर हल्ल्याचा संशय; 1200 विमानांचे मार्ग बदलले, पुरस्कारासाठी गेलेले उपमुख्यमंत्री शिंदेंचे 6 अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले

मुंबई (प्रतिनिधी) : लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सायबर हल्ला झाल्याच्या संशयामुळे जवळपास सर्व विमानांची उड्डाणे 10 ते 12 तास उशिराने होत असल्याची माहिती आहे. तर तब्बल 1200 फ्लाईट्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. अशातच या विमानांच्या उड्डाणांचा फटका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरसह इतर अधिकाऱ्यांना बसल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दोन महत्त्वाचे आणि स्वतंत्र कार्यक्रम होणार असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या दोन दिवसीय लंडन दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. अशातच अचानक झालेल्या सायबर हल्ल्यामुळे मुंबईतून पुरस्कार सोहळ्यासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याचा फटका बसल्याची माहिती आहे. यात सहा अधिकारी झ्युरिकमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत आहे.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात असून त्यांची फ्लाईट वेळेत असल्याची माहिती आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि फोटोग्राफर यांची फ्लाईट डायव्हर्ट करण्यात आली आहे. हिथ्रोऐवजी हे विमान झ्युरिकला गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या लंडनमध्ये सायंकाळचे 5 वाजले असून, पहाटे 7 वाजता त्यांना लंडनला नेण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दोन महत्त्वाचे आणि स्वतंत्र कार्यक्रम होणार असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या दोन दिवसीय लंडन दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांना तीन विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 तसेच ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026’मध्ये त्यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री लंडनला रवाना झाले. यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 9 सप्टेंबर 2026 रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा पार पडणार आहे.

 उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर द राइट ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पाठवले आहे. शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान दिला जाणार असल्याचे निमंत्रकांनी म्हटले आहे.