कोंबडीने अंडी उबवली अन् ४० आमदार बाहेर आले...; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

कोंबडीने अंडी उबवली अन् ४० आमदार बाहेर आले...; संजय राऊतांचा एकनाथ  शिंदेंना टोला

नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हावर सुनावणी सुरू असताना झालेल्या या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवर जोरदार निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. "पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून ४० आमदार बाहेर आले," असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या फुटीवर उपहासात्मक टिप्पणी केली. मोदी आणि शिंदेंच्या भेटीत 'तू किती फोडलेस, मी किती फोडले आणि अजून किती फोडायचे,' यापलीकडे काहीही चर्चा होणार नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच, अदानींना महाराष्ट्रात आणखी काय विकायचे आणि किती मालमत्ता द्यायची, यावरच तिथे चर्चा चालली असेल, असा गंभीर आरोपही राऊतांनी केला.

 मोदी-शिंदे भेटीवर टीका:
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे संसदेत येण्यासाठी वेळ नाही, पण फुटीर खासदारांसोबत ब्रेकफास्ट बैठक घेण्यासाठी वेळ आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

हिंमत असेल तर नवीन पक्ष काढा:
नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्याप्रमाणे हिंमत असेल तर एकनाथ शिंदेंनी स्वतःचा वेगळा पक्ष काढून स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान राऊतांनी दिले.

बाळासाहेबांच्या पक्षावर अधिकार नाही:
दुसऱ्याच्या मदतीने पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवून त्यावर निवडणुका लढवणे योग्य नसून, शिवसेनेच्या मतांवर शिंदे गटाचा कोणताही अधिकार नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले

स्वतःच्या पक्षाचे नाव आणि चिन्हावर लढा निवडणूक:

एकनाथ शिंदे यांनी "शिवसेना कोणाची, याचा निर्णय जनतेने आधीच केला आहे," असा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, "पक्षांतर केल्यानंतर नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि राज ठाकरे यांनी 'मनसे' स्थापन केली. त्यामुळे शिंदेंमध्ये खरोखर नेतृत्वाची हिंमत असेल, तर त्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा आणि दुसऱ्याच्या चिन्हाचा सहारा घेता स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःच्या चिन्हावर निवडणूक जिंकून दाखवावी." बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असून निवडणूक आयोगाने दबावाखाली निर्णय घेतल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.