संजय राऊत म्हणाले, ‘म्हस्के शिंदेंविरोधातील तक्रारींचं नेतृत्व करत होते’; संतापलेल्या नरेश म्हस्केंचा पलटवार, म्हणाले
मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे हे ‘रेम्या डोक्याचे’ आहेत, त्यांचा फार अभ्यास नाही, असा व्यक्ती सत्तेत असणे ही राज्यासाठी चिंतेची गोष्ट आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांमध्ये नरेश म्हस्के होते. ठाण्यातून शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व म्हस्के करत होते. महापालिकेत कसा भ्रष्टाचार सुरू आहे, आम्हाला कसे काम करू दिले जात नाही, याबाबत त्यांनी पत्रव्यवहार केला होता. या पत्रांचे रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.

आता ते तिथे गेले आहेत, कारण प्रत्येकाच्या काही मजबुरी असू शकतात,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं.संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर नरेश म्हस्के यांनी जोरदार पलटवार करत खुलासा केला आहे.नरेश म्हस्के म्हणाले, “संजय राऊतांना विचारा, खासदारांना विचारा, त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यासाठी जेव्हा उशीर लागत होता, तेव्हा ते उद्धवजींपासून कशा पद्धतीने शिवीगाळ करत होते, हे अख्ख्या शिवसेनेला माहीत आहे. आम्ही आपला रिस्पेक्ट ठेवतो, त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका.”
पुढे बोलताना म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. “नरेश म्हस्के खुली किताब आहे. आम्ही काय तुमच्यासारखे पत्राचाळ आणि हे घोटाळे करणारे लोक नाही आहोत. अडचणी तुमच्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मी पत्रे लिहिली असल्याचा खोटा दावा केला जात आहे. त्यांनी माझं एकतरी पत्र दाखवावं, जे मी लिहिलेलं आहे,” असं म्हस्के म्हणाले.“जर माझं पत्र असेल तर मी राजीनामा देईन आणि जर ते हे सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणीही नरेश म्हस्के यांनी केली.
तसंच, “मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत होतो आणि कायम राहणार आहे. ज्या दिवशी शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, त्या दिवशी वरुण सरदेसाईंमार्फत मला 10 ते 15 फोन आले होते. मातोश्रीवर दोन मिनिटांसाठी येण्याची विनंती केली होती. पण मी तेव्हाही स्पष्ट सांगितलं की, मी मातोश्रीवर येणार नाही, आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत आहोत,” असा दावा म्हस्के यांनी केला.
“याच्या 15 दिवस अगोदरही ठाण्यामध्ये ‘नेतृत्व तू स्वीकार’ असं सांगण्यासाठी मला बोलावण्यात आलं होतं. तेव्हाही मी सांगितलं की, हा विषय माझा नाही, आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. कुठल्याही स्वार्थासाठी नरेश म्हस्के एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेलेला नाही. कारण शिंदे साहेबच खऱ्या अर्थाने संघटनेला पुढे घेऊन जाऊ शकतात,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले. “पवईच्या हॉटेलमध्ये संजय राऊतांनी काही आमदारांची बैठक घ्यायला लावली होती आणि ‘माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या’ असं सांगून त्यांच्या मागे लागले होते. लोकांनी त्यांना खुश करण्यासाठी बैठक घेतली होती. पण लोक या गोष्टीवर हसत होते की, या माणसाला नक्की झालंय काय,” असा दावा त्यांनी केला.
“संजय राऊत, तुमचं जे प्रेम आहे ना, हे बेगडी प्रेम आहे. तुम्हाला पूर्ण पक्ष हातात घ्यायचा आहे आणि काँग्रेससोबत हा पक्ष घेऊन जायचा आहे. तुम्ही या पक्षाचा सत्यानाश केला आहे,” अशी टीकाही नरेश म्हस्के यांनी केली.“तुम्हीच त्यांच्या डोक्यात घातलं बहुतेक मुख्यमंत्री व्हा आणि महाराष्ट्राला एक कुचकामी मुख्यमंत्री आपण दिलात. काँग्रेससोबत जाण्यास तुम्ही भाग पाडलं आणि एकसंघ शिवसेनेचं वाटोळं केलं. शिवसैनिकांचे हे शिव्याशाप तुम्हाला भोगावे लागणार आहेत,” असा घणाघात नरेश म्हस्के यांनी केला.




