गुणवंत विद्यार्थिनींसाठी ‘पद्माराजे पारितोषिक’; राजर्षि शाहू बँकेचा उपक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे सभासदांच्या मुलींसाठी यावर्षीही ‘पद्माराजे पारितोषिक’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि ग्राहक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवार, 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणार आहे. प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार असून, जास्तीत जास्त महिला व मुलींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात सभासदांच्या मुलींनी इयत्ता चौथी ते आठवीमध्ये सरासरीनुसार ‘ब’ श्रेणी अर्थात 61 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता नववी, दहावी आणि बारावीमध्ये किमान 80 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनी या पारितोषिकासाठी पात्र असतील. पात्र विद्यार्थिनींना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय केंद्र किंवा राज्य स्तरावर कला, क्रीडा, साहित्य तसेच अन्य क्षेत्रांत प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आलेल्या सभासदांच्या मुला-मुलींनाही या उपक्रमासाठी अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत गुणपत्रिकेची साक्षांकित सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 अखेर बँकेच्या प्रधान कार्यालयात किंवा नजीकच्या शाखेत सादर करावेत.
अर्जासोबत सभासदाचे संपूर्ण नाव, पत्ता, फोन क्रमांक, सभासद क्रमांक आणि ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक पाल्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा, अशी सूचना बँकेने केली आहे.बँकेचे अध्यक्ष रविंद्र सुशिला वसंतराव पंदारे यांनी पत्रकाद्वारे सभासदांना वेळेत अर्ज सादर करून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




