देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल; म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी पुन्हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता आरपारची लढाई लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही ओबीसी हक्क बचावाचा मुद्दा उपस्थित करत जरांगे यांच्या टीकेला उत्तर देताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.

मात्र, प्रत्येकवेळी सरकारकडून जरांगे पाटील यांना आश्वासन दिलं जातं, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातात, तरीही पुन्हा फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता विरोधकांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप करत भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या लोकांना पुढे करून जरांगे पाटील यांना शब्द दिला जातोय. सगळ्या पक्षांचे अनेक नेते जरांगे पाटील यांना भेटले, पण देवेंद्र फडणवीस आजवर कधी त्यांना भेटले का? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
आंतरवाली सराटीमध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला, त्याला बढती देण्यात आली आणि शंभूराज देसाई यांच्यावर ज्याने हल्ला केला, त्यालाही बढती देण्यात आली, असा आरोप करत भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांपैकी काहींचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. "दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला, हे त्यांनी मान्य करावे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत आपली झालेली चूक सुधारू, असं सांगितलं, तशीच भूमिका फडणवीस का घेत नाहीत? त्यांना संपूर्ण समाजाचा रोष अंगावर घ्यायचा आहे का?" असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
दरम्यान, परभणीमधील घटनेनंतर सरकारवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली आहे. 108 रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करूनही ती उपलब्ध न झाल्याने आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून त्यांनी संताप व्यक्त केला.
परभणीमधील ही घटना सरकारच्या हलगर्जीपणामुळेच घडली असून, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही, त्याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. "महाराष्ट्र केयरलेस लोकांच्या हातात आहे, केयरलेस प्रशासनाच्या हातात आहे," अशी टीकाही त्यांनी केली.




