एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला; म्हणाले, "जनाधाराच्या कसोटीवर जनतेनेच शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले
मुंबई: शिवसेना नेमकी कोणाची? या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असली, तरी राजकीय आणि जनाधाराच्या कसोटीवर जनतेनेच खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे खणखणीत प्रत्युत्तर शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, "शिवसेना कोणाची, याचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दिला आहे. आम्ही ४० आमदारांसह बाहेर पडलो आणि जनतेने आम्हाला ६० आमदारांपर्यंत पोहोचवून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. जनतेच्या न्यायालयात आमचा विजय आधीच झाला आहे."
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निकालाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, "सध्याचे सरकार संविधानाने आणि कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेनुसार स्थापन झाले असून ते घटनाबाह्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरीही विरोधक तीच जुनी कॅसेट पुन्हा-पुन्हा वाजवत आहेत." आम्ही कोणावरही वैयक्तिक टीका करत नसून जनता, सत्य आणि संविधान या तिन्ही गोष्टी आमच्या बाजूने असल्याने आपण पूर्णपणे निर्धास्त असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.




