शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी; 'उद्धव ठाकरेंनीच शिंदेंची नेता म्हणून निवड केली', ठाकरे गटाचा मोठा युक्तिवाद

शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी; 'उद्धव ठाकरेंनीच शिंदेंची नेता म्हणून निवड केली', ठाकरे गटाचा मोठा युक्तिवाद

नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणीचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. "उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख असताना त्यांनीच एकनाथ शिंदे यांची पक्षाचे 'नेता' म्हणून निवड केली होती आणि पक्षाच्या घटनेनुसार याची रीतसर माहिती निवडणूक आयोगालाही देण्यात आली होती," असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडला.

 

अजय चौधरींच्या निवडीचाही न्यायालयात उल्लेख

युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी बंडाच्या वेळच्या घडामोडींवर प्रकाश टाकला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार जेव्हा सूरत आणि गुवाहाटी येथे गेले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विधिमंडळ गटाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांची विधिमंडळ गटनेतेपदी रीतसर निवड करण्यात आली होती, अशी माहितीही सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

सुनावणी अंतिम टप्प्यात; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या सत्तासंघर्षाच्या केसची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.