डी. वाय. पाटलांचे कार्य आणि योगदान अतुलनीय ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी वाहिली श्रद्धांजली

डी. वाय. पाटलांचे कार्य आणि योगदान अतुलनीय ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी वाहिली श्रद्धांजली

कोल्हापूर/प्रतिनिधी: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज कोल्हापूर येथे भेट देऊन ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खर्गे यांनी डी. वाय. पाटील यांच्यासोबतच्या आपल्या ३० ते ४० वर्षांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

३०-४० वर्षांची मैत्री आणि महान कार्य
माध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "काल मी संसदेत (पार्लमेंट) असताना मला डी. वाय. पाटील यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. मी त्यांना ३० ते ४० वर्षांपासून ओळखत होतो. ते एक उत्तम व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ आणि क्रीडाप्रेमी होते. त्यांनी आपल्या आयुष्यात राज्यपाल, केंद्रीय मंत्री यांसारख्या विविध पदांवर काम करताना समाजाची आणि राज्याची मोठी सेवा केली."

शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदान
 खर्गे पुढे म्हणाले की, डी. वाय. पाटील यांनी कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा मोठा विस्तार केला. त्यांनी कोल्हापूरला समृद्ध बनवण्यात आणि शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवण्यात मोठे योगदान दिले. कोणालाही मदत करताना किंवा सार्वजनिक कार्य करताना त्यांनी नेहमीच निस्वार्थी वृत्ती दाखवली. वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत त्यांनी समाजासाठी अविरत कार्य केले.

कुटुंबाचे केले कौतुक
 डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबाविषयी बोलताना खर्गे म्हणाले, "त्यांच्या कुटुंबाने, मुलांनी आणि मुलींनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबात एवढा ताळमेळ आणि एकजूट राहणे खूप दुर्मिळ असते. अशा प्रकारची नेतृत्व क्षमता असणारे नेते फार कमी असतात."

शेवटी बोलताना खर्गे यांनी, "ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो," अशी प्रार्थना केली.