कळंबा तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करा; जि.प. सदस्या विनिता भोगम यांची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी): कळंबा, पाचगाव, कोल्हापूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी कळंबा तलाव हा महत्त्वाचा जलस्रोत आहे. हा तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक घरगुती गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या विनिता सागर भोगम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मागील वर्षांप्रमाणे यंदाही कळंबा तलाव परिसरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन कुंड, कृत्रिम विसर्जन टाकी, मुबलक पाणी, स्वच्छता आणि निर्माल्य संकलनाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. तसेच नागरिकांनी गणेशमूर्ती व निर्माल्य थेट तलावाच्या पाण्यात विसर्जित न करता पर्यावरणपूरक व्यवस्थेचा वापर करावा, यासाठी आवश्यक जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे
गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करूया, कळंबा तलाव प्रदूषणमुक्त ठेवूया" हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून, महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून प्रभावी विसर्जन व्यवस्था उभारावी, अशी मागणी विनिता भोगम यांनी केली आहे.




