आंदोलनाला परवानगी नाही, तरीही मुंबईत जाणार; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मुंबई प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापुढे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आझाद मैदान पोलिसांनी यासंदर्भात पत्र देत आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागची कारणे स्पष्ट केली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या ‘जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025’चा दाखला पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नियमांमध्ये आझाद मैदान परिसरात होणाऱ्या आंदोलनांसाठी काही स्पष्ट अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आंदोलनाला एका वेळी केवळ एका दिवसाची परवानगी देता येते. तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय, आंदोलनादरम्यान उपोषण किंवा आत्मदहनाचा प्रयत्न करता येणार नसल्याची तरतूद नियमांमध्ये आहे. जरांगे पाटील यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथील सभेत मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या अर्जातही ‘आंदोलन व आमरण उपोषण’ असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी पत्रात नमूद केले आहे.
पोलिसांनी मागील वर्षीच्या आंदोलनाचाही संदर्भ दिला आहे. 29 ऑगस्ट 2025 पासून जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात अनिश्चित काळासाठी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी नियम व अटींचा भंग झाल्याचा दाखला देत यावेळी परवानगी नाकारण्यात आली आहे.
दरम्यान, आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मुंबईत जाणारच’ असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जरांगे यांच्या मुंबई आंदोलनावरून सरकार आणि आंदोलकांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.




