डेटिंग ॲपवरून मैत्री अन् हॉटेलमध्ये बोलावलं; दोन बहिणींवरील अत्याचाराने मुंबईत खळबळ
मुंबई प्रतिनिधी - डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवून तरुणींना भेटीसाठी बोलावून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिंडर ॲपवरून ओळख झालेल्या दोन तरुणींना नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात भेटण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितांपैकी एक मुलगी अल्पवयीन आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची काही दिवसांपूर्वी टिंडर ॲपवरून दोन तरुणांशी ओळख झाली. दोन्ही बाजूंमध्ये काही काळ ऑनलाइन संवाद सुरू होता. या संवादातून विश्वास निर्माण झाल्यानंतर संशयितांनी दोन्ही बहिणींना सीवूड्स येथे भेटण्यासाठी बोलावले.
मुलींना सीवूड्सपर्यंत पोहोचण्यासाठी संशयितांनी ऑनलाइन टॅक्सी बुक केली होती. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना मॉलसह परिसरातील विविध ठिकाणी फिरवण्यात आले. त्यानंतर एका ठिकाणी त्यांना बीअर पाजण्यात आली. दोन्ही मुली नशेत असल्याचा फायदा घेत त्यांना विश्रांतीच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये नेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही बहिणींवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. घटनेनंतर घरी परतलेल्या बहिणींनी घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दोन्ही पीडितांची वैद्यकीय तपासणी केली असून, संशयितांचा शोध सुरू आहे. मॉल, हॉटेल आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच संशयितांनी बुक केलेल्या ऑनलाइन टॅक्सीची माहितीही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे पीडितांपैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये प्रवेश कसा मिळाला, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. हॉटेल प्रशासनाने ओळखपत्रांची योग्य पडताळणी केली होती का, याबाबतही चौकशी सुरू आहे.




