गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणे अयोग्य; मनोज जरांगेंनी पुनर्विचार करावा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला येण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "गणेशोत्सव सुरू असताना मुंबईत येऊन आंदोलन करणे आणि गणेशभक्तांना असुविधा निर्माण करणे हे कुणासाठीच योग्य नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

चर्चेची दारे नेहमी उघडी; संविधानाच्या चौकटीत मागण्या पूर्ण करणार
फडणवीस पुढे म्हणाले की, "राज्य सरकारने मराठा समाजाच्या जवळजवळ सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. काही मागण्या सध्या न्यायालयात किंवा विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत. इतर संवैधानिक पद्धती आणि न्यायालयाच्या चौकटीशिवाय या मागण्या मान्य करता येणार नाहीत, हे आम्ही आधीच अवगत केले आहे. सरकारने चर्चेची दारे कधीही बंद केलेली नाहीत. राज्यघटनेच्या आणि न्यायालयाच्या नियमांत बसणाऱ्या सर्व गोष्टी करायला सरकार तयार आहे."
मी एकटाच मुंबईला येतोय - मनोज जरांगे ठाम
दुसरीकडे, अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील १५ सप्टेंबरला मुंबईकडे रवाना होण्यावर ठाम आहेत. "आता मला खिंड लढू द्या, मी एकटाच मुंबईला येतोय," असे सांगत त्यांनी मराठा समाजाला वाहनांचे नियोजन आहे तसेच ठेवण्याचे आणि वर्गणीचे पैसे खर्च न करण्याचे आवाहन केले आहे. जरांगे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




