मनोज जरांगेंना कोर्टाच्या परवानगीने मुंबईत जाऊ द्यावे : खासदार शाहू महाराज छत्रपती

मनोज जरांगेंना कोर्टाच्या परवानगीने मुंबईत जाऊ द्यावे : खासदार शाहू महाराज  छत्रपती

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करू इच्छिणारे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे. "आंदोलन करणे हा अधिकार आहे. कोर्टाने परवानगी दिल्यास त्यांना मुंबईत जाऊ दिले पाहिजे. मात्र, त्यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासनाने पुढील योग्य ती पावले उचलावीत," असे शाहू महाराज यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे गणपती बाप्पाच्या आगमनावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

"दोन्ही बाजूंनी चर्चेचे प्रयत्न सुरू राहावेत"
मनोज जरांगे मुंबईत पोहोचण्यापूर्वी सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. यावर बोलताना शाहू महाराज म्हणाले की, "जरांगे मुंबईत पोहोचण्याआधी त्यांच्याशी संपर्क साधून संवादाचे प्रयत्न सुरूच राहतील. दोन्ही बाजूंनी प्रयत्न थांबता कामा नयेत." जरांगे यांच्या आक्रमक भाषेवर विचारले असता, "दर ४०-५० किलोमीटर अंतरावर सर्वांची भाषा बदलते. त्यांची भाषा ही त्यांची भाषा आहे आणि आपली वेगळी आहे. आपली भाषा त्यांना आणि त्यांची भाषा आपल्याला समजून घेता आली पाहिजे," अशी सौम्य भूमिका त्यांनी घेतली.

डॉल्बीचा वापर शून्यावर यावा; समान नागरी कायद्यावरही भाष्य
गणेशोत्सवातील डीजे आणि डॉल्बीच्या वापराबाबत शाहू महाराजांनी चिंता व्यक्त केली. "डॉल्बीचा त्रास विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे डॉल्बीचा वापर कमीत कमी झाला पाहिजे, किंबहुना तो शून्यावर आला तर अधिक चांगले होईल," असा सल्ला त्यांनी दिला. केंद्र सरकारच्या समान नागरी कायद्याच्या (UCC) चर्चेवर भाष्य करताना, "केंद्र सरकार कायदा लागू करू शकते, परंतु तो सर्वच राज्यांत एकाच वेळी लागू केला जाणार नाही, अशा बातम्या समोर येत आहेत," असे ते म्हणाले.