आधी तिबेटमध्ये भूकंप, मग नेपाळमध्ये महाप्रलय! शेकडो भारतीय बेपत्ता तर हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
नेपाळ: नेपाळमध्ये अचानक आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. चीनच्या तिबेटमधून आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात मोठा विध्वंस झाला आहे. भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने तिमुरे आणि स्याब्रुबेसी भागातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीचे अत्यंत रौद्ररूप पाहायला मिळत आहे.

पुलांचे जाळे उद्ध्वस्त, १०० हून अधिक मृत्यूची भीती
व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये शांत वाहणाऱ्या नद्या काही क्षणांतच भयानक रूप धारण करताना दिसत आहेत. या महाप्रलयात अनेक पूल, रस्ते, वाहने आणि इमारती पाण्याचा प्रचंड प्रवाहात वाहून गेल्या आहेत. या पुरामध्ये आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.
शेकडो भारतीय पर्यटक आणि नागरिक बेपत्ता
या भीषण आपत्तीत मोठ्या संख्येने लोक बेपत्ता झाले आहेत. नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, १०५ भारतीय नागरिकांसह एकूण २९१ परदेशी पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत. यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या ३१ तीर्थयात्रींचाही समावेश आहे. याशिवाय, तिमुरे सीमा चौकीवरील ९ पोलीस कर्मचारीही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सीमाभागाकडून बेपत्ता झालेल्या भारतीय पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता पर्यटकांमध्ये ३७ भारतीय वंशाचे एनआरआय (NRI) असून, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, ब्रिटन, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांचाही समावेश आहे.
लष्कराचे हेलिकॉप्टर्सद्वारे युद्धपातळीवर बचावकार्य
परिस्थितੀचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी रसुवा येथील पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्यासाठी नेपाळी सैन्य, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांना तातडीने तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रभावित भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त सुरक्षा दल, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत. नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेपाळ लष्कराच्या माहितीनुसार, आतापर्यंत हेलिकॉप्टरच्या मदतीने १२ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्याला अधिक वेग देण्यासाठी लष्कराची ४ आणि खासगी क्षेत्रातील ८ अशी एकूण १२ हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली असून पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




