ट्रम्प यांची शांतता कराराची घोषणा; जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा, तरीही अनिश्चितता कायम

ट्रम्प यांची शांतता कराराची घोषणा; जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा, तरीही अनिश्चितता कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाबाबत झालेल्या नव्या घोषणेमुळे जागतिक स्तरावर काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त या सामंजस्याची घोषणा केली. मात्र, हा अंतिम आणि कायमस्वरूपी शांतता करार नसून सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठीचा प्राथमिक करार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

येत्या १९ जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे संबंधित करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली होण्याची शक्यता असून अमेरिकन नौदलाची नाकेबंदीही संपुष्टात येऊ शकते. पुढील साठ दिवसांत इराणच्या आण्विक कार्यक्रमासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

या घोषणेमुळे जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण दिसून आली आहे. तेल आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांसाठी ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. इंधनटंचाई आणि महागाईच्या दबावातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.इराणकडूनही या कराराचे स्वागत करण्यात आले असले तरी दीर्घकालीन शांततेबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. युद्धामुळे विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि व्यापाराला चालना मिळवण्यासाठी हा करार उपयुक्त ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन स्थैर्यासाठी व्यापक आणि बहुपक्षीय करार आवश्यक असतो. त्यामुळे सध्याचा करार हा सकारात्मक पाऊल असला तरी त्यातून कायमस्वरूपी समाधान निघेलच, याची खात्री देता येत नाही.डोनाल्ड ट्रम्प यांच्या पूर्वीच्या धोरणांचा विचार करता या घोषणेकडे सावध आशावादाने पाहिले जात आहे. २०१५ मधील इराण आण्विक करारातून अमेरिकेने २०१८ मध्ये माघार घेतल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, सध्याच्या कराराच्या अंमलबजावणीवर जगाचे लक्ष लागले आहे.