राष्ट्रवादीत मोठे संघटनात्मक बदल? महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांचे नाव आघाडीवर

राष्ट्रवादीत मोठे संघटनात्मक बदल? महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांचे नाव आघाडीवर

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांची मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी उशिरा रात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुका आणि पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने झालेल्या या बैठकीत रिक्त पदे भरणे आणि काही पदांवर फेरनियुक्ती करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक अध्यक्ष ही महत्त्वाची पदे नव्या चेहऱ्यांना देण्याचा विचार सुरू असून, विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष पदांवर सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे यांचे नाव आघाडीवर असून, विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे आणि युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांच्या जागी नव्या नेतृत्वाची निवड करण्याबाबत पक्षात हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महिला आघाडीच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.या संभाव्य फेरबदलांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेला नवे बळ मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.