मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना संशोधनासाठी प्रविण घेवारी यांना पीएच.डी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. (डॉ.) प्रविण बसवेश्वर घेवारी यांना भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.

‘Design and Optimization of Microstrip Patch Antenna for Advanced Wireless Applications’ या विषयावरील त्यांच्या संशोधन प्रबंधास विद्यापीठाने मान्यता देत पीएच.डी. पदवी बहाल केली. हे संशोधन त्यांनी प्रा. डॉ. विनोद एच. पाटील, रिसर्च गाईड, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, भारती विद्यापीठ, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
आधुनिक वायरलेस दळणवळण प्रणालींसाठी मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेनाच्या रचना व कार्यक्षमतेच्या अनुकूलनावर आधारित हे संशोधन भविष्यातील 5G/6G तसेच प्रगत वायरलेस तंत्रज्ञानाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रा. (डॉ.) घेवारी यांनी अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन, शैक्षणिक नेतृत्व आणि विद्यार्थी मार्गदर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
त्यांच्या संशोधन कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयसिंह माने, ट्रस्टी मनीषा माने तसेच संचालिका डॉ. संगीता चौगुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण, संशोधन व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




