राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् बँकेची 108 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् बँकेची 108 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर  येथील राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर या बँकेची 108 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रतिभानगर हौसिंग सोसायटी हॉल, सागरमाळ, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाली. बँकेचे संचालक  विलासराव कुरणे यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रा. शिंदे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषयवार वाचनास प्रारंभ केला. अहवाल सालात निधन झालेल्या व्यक्तींना तसेच देशातील थोर व्यक्ती, लेखक, कवी, नेते, हितचितंक, सभासद व ज्ञात, अज्ञात व्यक्ती, ठेवीदार, मातृभूमीसाठी देश रक्षणार्थ धारातीर्थी पडलेले वीर जवान, यांना अंतःकरणपूर्वक श्रध्दाजंली वाहण्यात आली.

प्रास्ताविकामध्ये बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी बँकेने 108 वर्षे पूर्ण केली असून बँकेने " 109 व्या" वर्षात पदार्पण केले आहे. बँकेच्या सर्व सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास दाखवून सहकार्य केलेबद्दल आभार मानले.

आपल्या पारदर्शक कारभाराद्वारे बँकेने ठेवींचा चढता आलेख कायम ठेवलेला असून आज रोजी बँकेकडे रु.250 कोटी इतक्या ठेवी असलेचे सांगितले व कर्जे रु. 165 कोटी असलेचे सांगितले. बँकेचा एनपीए सलग पंधरा वर्षे 0% (शून्य टक्के) आहे. अहवाल सालात बँकेस ऑडिट वर्ग "अ" तसेच रिझर्व्ह बँकेचे "ग्रेड-I" मानांकन असलेचे सांगितले. बँकेने RBI चे FSWM बाबतचे सर्व सात निकष पूर्ण केले असलेने आपली बँक "आर्थिकदृष्ट्या सशक्त व योग्य व्यवस्थापन "असणारी बँक म्हणून गणली जात असलेचे यावेळी नमूद केले.

सेवानिवृत्त (पेन्शनर) कर्जदार सभासद मयत झालेस त्यांनी बँकेडून घेतलेल्या कर्जास 100% कर्जमाफी देणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच बँकेमार्फत सभासदांना लवकरच UPI सुविधा उपलब्ध करुन देणार असलेचे सांगितले. बँकेचे खर्चात कपात होणेचे उद्देशाने प्रधान कार्यालय येथे सोलर पॅनेल बसविले आहे. ज्यामुळे वीज बिलापोटी होणाऱ्या खर्चामध्ये बचत होणार आहे. त्याचबरोबर काही शाखांचे इमारतीचे भाडेपोटी खर्च होत आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या जागेमध्ये सुरु करणेचा संचालक मंडळाचा मानस असलेचे नमूद केले.

संचालक मंडळाने खर्चामध्ये काटकसर करणेचे धोरण अवलंबिले असून बँकेने अहवाल सालात रक्कम रु.2 कोटी 57 लाख इतका विक्रमी नफा मिळविलेला आहे हे बँकेचे प्रगतीचे व स्थैयाचे प्रतिक असलेचे सांगितले.

सभासदांना वितरीत करणेत येणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा रु. 25 लाखावरुन वाढवून कर्जाची कमाल एकत्रित मर्यादा रु. 30 लाख इतकी करणेत आलेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी जाहिर केले. भविष्यात कर्जाची मर्यादा आणखीन वाढविणार असलेचे नमूद करुन पंचवार्षिक निवडणूकीमध्ये दिलेली आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार असलेचे यावेळी सांगितले.

सभासदांना सन 2024-25 सालासाठी गतवर्षीपेक्षा जादा म्हणजेच 9 % लाभांश देण्याचे जाहिर केले. सदरचा डिव्हिडंड त्वरीत वाटप सुरु करणार असलेचे सांगितले. बँकेतर्फे राबविणेत येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी उपस्थित सभासदांना देणेत आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रा. शिंदे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयानुसार अहवाल वाचन केले. विषयवार सविस्तर चर्चा होऊन ते सर्व विषय एकमताने हात उंचावून / आवाजी मतदानाने मंजूर करणेत आले. यावेळी बँकेचे कार्यक्षेत्र सात जिल्ह्याचे आहे. ते वाढवून बँकेचे कार्यक्षेत्र आणखीन तीन जिल्ह्यांमध्ये वाढवून एकूण 10 जिल्ह्यामध्ये करणेबाबतचा ठराव, तसेच अन्य दुरुस्त्या एकमताने मंजूर करणेत आल्या. सभासदांनी दिलेले लेखी प्रश्न व सूचनांचे निरसन उभय संचालकांनी केलेने सभा खेळीमेळीत पार पडली.

बँकेचे उपाध्यक्ष सदानंद घाटगे यांनी आभार मानून सभा संपन्न झाली. उपस्थित सभासदांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक सदस्य यांचे हार तुरे घालून अभिनंदन केले.

यावेळी बँकेचे अध्यक्ष रोहित रोहिणी प्रकाश बांदिवडेकर, उपाध्यक्ष सदानंद रुक्मिणी वसंतराव घाटगे, संचालक सर्वश्री रविंद्र सुशिला वसंतराव पंदारे, शशिकांत शांताबाई दिनकर तिवले, मधुकर आंबुबाई श्रीपती पाटील (एम.एस्.), अतुल मंगल गणपतराव जाधव, विलासराव अनुसया शंकरराव कुरणे, रमेश सरस्वती गणपती घाटगे, अजित सिंधुताई शंकर पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, संचालक संजय आक्काताई सर्जेराव खोत, किशोर ताई रामचंद्र पोवार, अरविंद सुशिला भिमराव आयरे, प्रकाश शांताबाई भिमराव पाटील, तज्ञ संचालक दिपक केराबाई श्रीपतराव पाटील, गणपत पार्वती बाबुराव भालकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सुलोचनादेवी रामराव शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे व कर्मचारी उपस्थित होते.