जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे ९ सप्टेंबर रोजी 'रानभाजी महोत्सव'

जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे ९ सप्टेंबर रोजी 'रानभाजी महोत्सव'

कोल्हापूर/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या विविध रानभाज्या व पारंपरिक खाद्यपदार्थांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, रानभाज्यांचे पौष्टिक व आरोग्यदायी महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच ग्रामीण महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 'रानभाजी महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे.

हा रानभाजी महोत्सव बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील प्रांगणात पार पडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत, उपाध्यक्षा तानाजी पाटील, सर्व समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते होणार आहे.

या महोत्सवामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत महिला स्वयंसहायता समूह मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विविध तालुक्यांतील समूहांकडून स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या ताज्या रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच महिला समूहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स या महोत्सवात लावण्यात येणार आहेत.

*आरोग्यदायी महत्त्व आणि उत्पन्नवाढ*

रानभाज्यांमध्ये असणारे नैसर्गिक पोषक घटक, त्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि पारंपरिक आहारातील त्यांचे स्थान याबाबत नागरिकांना या ठिकाणी सविस्तर माहिती मिळणार आहे. तसेच महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे.

सर्व तालुक्यांमधील महिला समूहांच्या सहभागामुळे या उपक्रमाला जिल्हास्तरीय स्वरूप प्राप्त होणार असून, ग्रामीण महिलांच्या कौशल्य, उत्पादनक्षमता व उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा महोत्सव ठरेल. जिल्ह्यातील नागरिकांनी या रानभाजी महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ व महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचा आस्वाद घ्यावा आणि ग्रामीण महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.