कुपोषण निर्मूलनासाठी जि. प. सदस्य दत्तक घेणार कुपोषित बालके; महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा परिषद येथील स्व. वसंतराव नाईक समिती सभागृहात महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती विद्या विलास पाटील यांच्या अध्यक्षातेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य आपापल्या मतदारसंघातील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सभेच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागीय पुरस्कार प्राप्त ठरलेल्या 'स्वयंप्रेरिका ग्रामीण महिला संस्था' (पोर्ले तर्फ बोरगाव) आणि 'भगवानबाबा शिक्षण प्रसारक संस्था' (इचलकरंजी) यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
अंगणवाड्यांच्या सद्यस्थितीचा आढावा
सभापती विद्या पाटील यांनी अंगणवाड्यांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ज्या अंगणवाड्यांमध्ये सोलर पॅनेल नादुरुस्त आहेत, तिथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तात्काळ वीज जोडणी (लाईट कनेक्शन) करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बालकांच्या आरोग्याच्या अचूक नोंदींसाठी नादुरुस्त वजनकाटे बदलून नवीन काटे देणे आणि बंद असलेले डिजिटल लर्निंग टीव्ही बदलून नवीन टीव्ही उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. यासोबतच, करवीर पंचायत समिती येथे महिलांसाठी नवीन समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे शिफारस करण्यात येणार आहे.
बैठकीदरम्यान सदस्य वर्षाराणी पाटील यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची/नशामुक्तची शपथ दिली. तर सदस्य सोनाली पाटील यांनी आभार मानले.
या बैठकीस समिती सदस्य वर्षाराणी पाटील, शैलजा पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे, सोनाली पाटील, विनिता भोगम, गडहिंग्लज पंचायत समिती सभापती प्रतिभा चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के, कक्ष अधिकारी संजय जाधव, अधीक्षक नारायण चांदकेर, विस्तार अधिकारी प्रशांत पाटील, सौरभ कांबळे आणि जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) उपस्थित होते.




