मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आणि जात पडताळणी प्रमाणपत्रासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस असून, सरकारकडूनही त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जरांगे यांनी अंतरवालीत 12 सप्टेंबर रोजी मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे.

सरकारकडून मागण्या मान्य होत नसल्याने मराठा समाजही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दारुबंदीबाबत महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. मनोज जरांगे यांच्या अंतरवालीतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार किंवा दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस अंतरवाली सराटी येत असलेल्या गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
मौजे अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासंबंधी आंदोलन सुरू असून, जमाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित गावांमध्ये असलेल्या घाऊक देशी-विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या सुरू राहिल्यास काही अनुचित प्रकार किंवा दंगल घडून सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दारुबंदीचे आदेश जारी केले आहेत. गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व घाऊक देशी-विदेशी मद्यविक्री दुकानदारांना 9 आणि 10 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे, म्हणजेच कोरडा दिवस पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, बीडच्या वडवणीत सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. याच उपोषणाच्या समर्थनार्थ वडवणीतील सकल मराठा समाज बांधवांनी आक्रमक होत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनामुळे बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.




