'शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्हीच धोका दिला'; मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली थेट टीका, बावनकुळेंवरही निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळालेल्या चार मराठा महिला लोकप्रतिनिधींची जातवैधता प्रमाणपत्रे समितीने रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथील या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे म्हणाले, राज्यात सरकारकडून नवीन कट रचला जात आहे. प्रमाणपत्रे सरकारच देते आणि सरकारच ती रद्द करते. हा कट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रचला जात आहे. तीन वर्षांत पहिल्यांदाच मी एकनाथ शिंदे यांचे नाव घेत आहे. सरकार मराठा समाजाचे नुकसान कसे करत आहे, हे मी सिद्ध करून दाखवणार आहे.
ते पुढे म्हणाले की, सरकारने नियोजनबद्ध पद्धतीने मराठा समाजाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आला आहे. 2029 मध्ये याच गोष्टीचे उत्तर दिले जाईल. युती सरकारचे मोजकेच लोक निवडून येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
ज्योती दहीहंडे प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर पुन्हा निशाणा साधला. फडणवीस साहेब, तुम्ही उगाच मराठा समाजाला लक्ष्य केले. यशवंत दहीहंडे यांची उर्दूमधील नोंद शिंदे समितीनेच ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावली होती. मराठा मंत्र्यांच्या माध्यमातून समाजाचे नुकसान करण्याचे प्रयत्न थांबवा, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही थेट आरोप केले. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास बावनकुळे यांनी सांगितले. त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी. एवढे अधिकार दिले तर तुमचे अनेक आमदार पाडू शकतो. पैशांसाठी प्रमाणपत्रे रद्द केली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तीन वर्षांत प्रथमच एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करत जरांगे म्हणाले, शिंदे साहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्हीच आमचा विश्वासघात केला. सत्तेत गेल्यानंतर मराठा समाजाकडे पाठ फिरवली का? तुम्ही डबल गेम खेळत आहात का? मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेणारे नेते तुमच्या कार्यालयात कसे येतात? असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, तुमच्या अनेक जागांवर आम्ही जीव तोडून काम केले. आमच्या समाजाने तुम्हाला साथ दिली, पण आता आमचाच गेम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतक्या लवकर मराठा समाजाचे योगदान विसरू नका. गरज पडली तर तुमच्या अनेक जागांवर पराभव घडवून आणू, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, त्यांनी सरकारवर स्वतःला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला. मला डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी कोणत्याही पक्षाचा नव्हतो आणि नाही. त्यामुळे मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. फडणवीस यांच्या परवानगीशिवाय बावनकुळे असे निर्णय घेऊ शकत नाहीत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.




