'गुंगी गुडिया' टीकेवरून राजकीय गदारोळ: राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर, पण सर्वोच्च नेत्यांचे मौन कायम
मुंबई: बीडमधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतील एका व्हिडीओवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठले आहे. काँग्रेसने राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर 'गुंगी गुडिया' अशी अत्यंत टोकाची टीका केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले असून काँग्रेसविरोधात आंदोलने करत आहेत. मात्र, दुसरीकडे या संपूर्ण वादावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील मुख्य नेत्यांनी बाळगलेले मौन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

वाद कसा सुरू झाला?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असताना एका पत्रकाराने त्यांना जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत थेट प्रश्न विचारला. सुनेत्रा पवार उत्तर देण्यापूर्वीच तिथे उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करत पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यावरून काँग्रेसने अधिकृत 'एक्स' (ट्विटर) हँडलवरून व्हिडीओ शेअर करत, "धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा आहेत का?" आणि "सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार?" असा थेट सवाल उपस्थित केला.
टिळक भवनात धडक अन् निदर्शने
काँग्रेसच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबईतील काँग्रेसचे मुख्य कार्यालय असलेल्या 'टिळक भवन' येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात घुसून निदर्शने केली. "महिलेचा असा अवमान सहन करणार नाही," अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईसह ठाणे आणि पुण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलने केली.
महिला नेत्या आक्रमक, पण मुख्य नेत्यांचे मौन
या प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. "महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्याचा सन्मान व्हायला हवा. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या पक्षाने पुरुषी मानसिकतेतून मर्यादा ओलांडून वैयक्तिक टीका करणे दुर्दैवी आणि अवमानकारक आहे," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
मात्र, एकीकडे पक्षाचे मंत्री आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काँग्रेसविरोधात संघर्ष करत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोन्ही मुख्य नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने या संवेदनशील विषयावर मौन बाळगल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.




