श्वेता महालेंचा VIDEO शेअर; संजय गायकवाडांसोबतचा वाद पुन्हा चिघळला
बुलढाणा प्रतिनिधी : भाजप आमदार श्वेता महाले आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद आता सोशल मीडियापर्यंत पोहोचला आहे. श्वेता महाले यांनी Instagram वर एक व्हिडीओ शेअर करत संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा आहे.काही दिवसांपूर्वी श्वेता महाले यांच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे वाजवण्यात आले होते. या गाण्यावर महाले थिरकल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर याबाबत संजय गायकवाड यांना माध्यमांनी प्रश्न विचारला.
यावेळी गायकवाड यांनी, ‘बाप तो बाप रहेगा’ हे एखाद्या पुरुषाने बोललेलं बरं. मात्र एखाद्या महिलेने ‘बाप आहे’ म्हटलं तर बापासारखं शरीर कुठून आणणार?, अशा आशयाची टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला.दरम्यान, गायकवाड यांच्या वक्तव्याविरोधात एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याबरोबरच त्यांनी केलेल्या कथित हावभावांवरही तक्रारीत आक्षेप घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आता श्वेता महाले यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘लगाओ जोर अपने तालूकात का, जरा हम भी तो जाणे तुम्हारा कौन बाप, हमें नहीं पता...इंस्टाग्रामच्या व्हिडीओनंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
बुलढाणा जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील हा वाद आता पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही नेते महायुतीतील घटक पक्षांशी संबंधित असताना त्यांच्यातील या शाब्दिक संघर्षामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
आता श्वेता महाले यांच्या या सोशल मीडिया पोस्टवर संजय गायकवाड काय प्रतिक्रिया देतात, तसेच या वादावर महायुतीतील वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




