दहावी, बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून होणार सुरुवात
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार २०२७ मधील बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा आणि अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे जावे, या उद्देशाने मंडळाने हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

परीक्षेचा कालावधी आणि महत्त्वाच्या तारखा:
- बारावी (HSC) परीक्षा:
- प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७
- लेखी परीक्षा: ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७
- दहावी (SSC) परीक्षा:
- प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७
- लेखी परीक्षा: १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७
अभ्यासाचे नियोजन करणे होणार सोपे
परीक्षांच्या संभाव्य तारखा आधीच स्पष्ट झाल्यामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना उर्वरित अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे व उजळणीचे (Revision) योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.
विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक आणि प्रात्यक्षिक परीक्षांची सविस्तर माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत वेळापत्रकावरच विश्वास ठेवून त्यादृष्टीने तयारी करावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.




