PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नवी दिल्ली - देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून 20 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी या योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या संदर्भातील अधिकृत घोषणा पीएम किसान योजनेच्या "एक्स" (पूर्वीचे ट्विटर) या अधिकृत खात्यावरून करण्यात आली आहे.

https://x.com/pmkisanofficial/status/1950226375677256144

या दिवशी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आयोजित विशेष कार्यक्रमातून हप्त्याचे वितरण होणार आहे. मोबाईलवर मेसेज आल्यानंतर रक्कम खात्यात जमा झाली असल्याची पुष्टी समजावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

योजनेचा इतिहास आणि हप्त्यांचे तपशील :

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात, जे तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2000 रुपये) वितरित होतात. आतापर्यंत 19 हप्त्यांचे वितरण यशस्वीपणे झाले असून, मागील हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. महाराष्ट्रातील 93,25,774 लाभार्थ्यांना त्या वेळी लाभ मिळाला होता.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचीही प्रतीक्षा - 

केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने "नमो शेतकरी महासन्मान निधी योजना" सुरू केली आहे. या योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

महत्त्वाची सूचना - 

शेतकऱ्यांनी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट आणि "एक्स" वरील खात्याच्या माध्यमातूनच माहिती मिळवावी. सोशल मीडियावर पसरवली जाणारी अपूर्ण किंवा चुकीची माहिती योग्य खात्रीशिवाय स्वीकारू नये, असे स्पष्ट आवाहन अधिकृत सूत्रांकडून करण्यात आले आहे.