संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन डॉ.पी.आर.भोसले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न.
पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले यांचा वाढदिवस सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न झाला. सोहळ्याच्या आरंभी सरांच्या आई-वडिलांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी गणेश स्तवन सादर केले.त्यानंतर सरांचे औक्षण करण्यात आले याप्रसंगी बॅचलर ऑफ फाईन आर्ट ची विद्यार्थिनी गायत्री घोटके हिने संस्कृत श्लोक सादर केला. त्यानंतर संजीवन अभियांत्रिकीचा विद्यार्थी विजय लोहार आणि संजीवन संगीत दालनातील बालकलाकारांनी सुमधुर गीतांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना भोसले सरांचे बंधू आणि संजीवन शिक्षण समूहाचे सह-सचिव एन.आर.भोसले यांनी सरांच्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आणि भोसले सर यांनी अत्यंत जिद्दीने, महत्त्वकांक्षेने आणि अथक परिश्रमाने संजीवन शिक्षण समूह साकारला याचा बंधू म्हणून अभिमान वाटतो अशा भावना व्यक्त करून सरांना शतायुषी जीवन लाभू दे असे शुभचिंतन केले.
यानंतर संजीवन अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्रथम वर्षाचे एच. ओ. डी. प्रा.देशमुख आणि पी. एम. गांजवे यांनी भोसले सर यांना रॅपिड फायर सेक्शनच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले आणि भोसले सर यांनी या प्रश्नांची अतिशय संयुक्तिक उत्तरे देऊन आपला हजरजबाबीपणा सिद्ध केला आणि उपस्थितांना निखळ आनंद दिला. त्यानंतर भोसले सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्यामुळेच संजीवनचा तीन दशकांचा ज्ञान प्रवास सुफळ झाल्याबद्दल उपस्थित सर्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.पालक हेच दैवत आणि विद्यार्थी हीच संपत्ती हाच संजीवनचा अत्यंत सिद्धांत असेल अशा भावना देखील सरांनी व्यक्त केल्या. केल्याने होत आहे रे हा माझा जीवनमंत्र आहे.या मुळेच मी इथपर्यंतचा जीवन प्रवास करू शकलो असे भावनिक उद्गार याप्रसंगी भोसले यांनी काढले.सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरामध्ये बहुसंख्य रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पन्हाळा येथील बालग्राम या अनाथ मुलांच्या सामाजिक संस्थेला सौरऊर्जेची उपकरणे आणि एक महिन्याचे धान्य देण्याचा स्तुत्य उपक्रम केला. बालग्रामच्या वतीने नरेंद्र, सौरभ आणि केदार या विद्यार्थ्यांनी संजीवन शिक्षण समूहाची ही सदिच्छा भेट स्वीकारली. या सुंदर सोहळ्याची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली.
या सोहळ्याप्रसंगी भोसले सरांचे सुपुत्र आणि संजीवन शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक सौरभ भोसले तसेच डॉ संजीव जैन, प्रा. थरकार, के. के. पोवार, शिल्पा पाटील-सांगावकर, बी.आर.बेलेकर, महेश पाटील, पी. एन.पाटील संजीवन शिक्षण समूहाच्या सर्व ज्ञान शाखांचे प्राचार्यवृंद, पन्हाळा आणि पंचक्रोशीतील नागरिक त्याचप्रमाणे संजीवनचे आजी-माजी पालक आणि माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील अग्रणी या नात्याने डॉ.पी. आर. भोसले यांना संजीवन शिक्षण समूहाच्या संचालक मंडळातील सदस्य, देश- विदेशातील विद्यार्थी, माजी पालक, परिवारजन, नातेवाईक, स्नेहीजन, आणि शिक्षणप्रेमी दिवसभर प्रत्यक्ष भेटून अथवा फोनद्वारे दिवसभर शुभेच्छा देत होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी आणि पांडुरंग गांजवे यांनी केले.




