कुंभमेळा बजेटवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; २५ हजार कोटी लाटल्याचा गंभीर आरोप
मुंबई: नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कुंभमेळ्याच्या ४५ हजार कोटी रुपयांच्या एकूण बजेटपैकी किमान २५ हजार कोटी रुपये मंत्री आणि अधिकारी मिळून उडवणार असून, त्याची सुरुवातही झाली असल्याचा दावा त्यांनी एका निवेदनात केला आहे.

कुंभमेळा नियोजनावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका
नाशिकमधील नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याचे सांगत संजय राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यातील सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे नमूद करत, आता नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे गांभीर्याने पाहणे सोडून दिल्याचे ते म्हणाले. या भ्रष्टाचाराविरोधात केवळ विरोधकच नव्हे, तर साधू-संतसुद्धा आवाज उठवत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सरकारची तुलना महात्मा गांधींच्या तीन माकडांशी
नाशिकमधील रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे जाणारे बळी प्रशासनाला दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल राऊतांनी केला. या सरकारची अवस्था महात्मा गांधींच्या तीन माकडांप्रमाणे झाली असून, यातील माकडांना भ्रष्टाचार दिसत नाही, ते त्यावर बोलत नाहीत आणि भ्रष्टाचार पाहातही नाहीत, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
दानचोरी आणि दत्तक प्रकरणावरून घणाघात
राममंदिरातील दानचोरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत, ज्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही ते कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर काय बोलणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याचे विसरल्यामुळेच शहराची दुर्दशा झाल्याचा आरोप करत, खोटे बोलण्यासाठी त्यांना 'मास्टर डिग्री' द्यावी लागेल, असा टोला राऊतांनी लगावला.




