"राम मंदिरात दरोडे पडतायेत अन् हे चोरून राज्य करणारे आम्हाला हिंदुत्व शिकवतायत"; संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात

"राम मंदिरात दरोडे पडतायेत अन् हे चोरून राज्य करणारे आम्हाला हिंदुत्व शिकवतायत"; संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात

मुंबई: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर संस्थानातील कथित चोरी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुकारलेल्या 'रामरक्षा' आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. "हे स्वतः चोरून राज्य चालवत आहेत आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत?" असा सवाल करत राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक मारुती मंदिरासमोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कडून टीका केली जात आहे. यावर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत प्रचंड भडकले. ते म्हणाले, "हिंदुत्वासाठी आंदोलन सुरू असेल, तर सत्ताधाऱ्यांनी त्यात सामील व्हायला हवे. आम्ही हिंदुत्व सोडल्याचे म्हणणाऱ्यांच्या काळात राम मंदिराची उघडपणे लूट सुरू आहे, तिथे दरोडे पडत आहेत."

राम मंदिरात अब्दुल, रहिम नाही तर मिश्रा, दुबे, राय यांनीच चोरी केली
 मंदिरातील चोरीचा पाढा वाचताना राऊत म्हणाले, "प्रभू श्रीरामाचा मुकुट, पादुका, कर्णफुले आणि सीतामाईला अर्पण केलेली २७ मंगळसूत्रे चोरीला गेली आहेत. तिथे कोणी अब्दुल किंवा रहिम चोरी करायला आले नव्हते, तर मिश्रा, दुबे, राय यांनीच ही चोरी केली आहे, ज्यांना नरेंद्र मोदींचे नेतृत्व आहे. अशी श्रीरामाची लूट करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विष खाऊन मेले पाहिजे. हे सत्ताधारी दुर्योधनवादी आहेत."

"तुमच्या हातात अफाट सत्ता, यंत्रणा आणि राम मंदिरातील लुटलेला पैसा आहे. ठेकेदारांकडून देणग्या घेऊन अयोध्येत कार्यक्रम करण्यात आले. पण हा पापाचा पैसा कोणालाही आणि त्यांच्या मुलाबाळांना पचणार नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे काही अमर नाहीत. एक नियती अशी असते, जी तुम्हाला पूर्णविराम देईल," असा थेट इशाराही राऊतांनी यावेळी दिला.